तेलंगणाच्या संगरेड्डी जिल्ह्यात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 45 वर्षीय राजिता नामक महिलेने आपल्या तीन निष्पाप मुलांना विष घालून ठार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तपासात असं समोर आलं आहे की, ती आपल्या जुन्या वर्गमित्राच्या प्रेमात पडली होती आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तिने स्वत:च्या मुलांचा बळी दिला.
घटनेचा तपशील
ही घटना संगरेड्डी जिल्ह्यातील आहे. मृत मुलांमध्ये 12 वर्षीय साई कृष्णा, 10 वर्षीय मधुप्रिया आणि 8 वर्षीय गौतम यांचा समावेश आहे. ही तिघंही भावंडं एकाच वेळी मृतावस्थेत सापडली. राजिता स्वत:ही सध्या विषप्रयोगामुळे फिनिसिया रुग्णालयात उपचार घेत आहे.
प्रेमसंबंधाचं पाश्वभूमी
राजिताचं लग्न चेनय्या नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. मात्र तिचं वैवाहिक जीवन समाधानी नव्हतं. काही दिवसांपूर्वी ती एका शालेय मेळाव्यात तिच्या जुन्या वर्गमित्राला भेटली. या भेटीनंतर दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला आणि काही कालावधीनंतर हे मैत्र प्रकरणात रूपांतरित झालं. राजिता आपल्या जुन्या प्रेमाशी नव्याने आयुष्य सुरू करू इच्छित होती, पण तिला वाटलं की तिचे तीन मुले तिच्या या नव्या सुरुवातीस अडथळा ठरतील.
हत्या कशा प्रकारे घडवून आणली?
ही घटना घडली त्या रात्री राजिताने रात्रीच्या जेवणात दह्यांत विष मिसळले. तिने ते दही आपल्या तीनही मुलांना वाढले. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळातच मुलांची प्रकृती बिघडायला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी चेनय्या त्याच्या नाईट शिफ्टवरून घरी परतल्यावर तो हादरला – तिघेही मुलं शुद्ध हरपून पडले होते आणि त्यांच्यात कोणतीही हालचाल नव्हती. राजिता देखील पोटदुखीची तक्रार करत होती. घाबरलेल्या चेनय्याने तिला तात्काळ फिनिसिया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
तपासात धक्कादायक खुलासा
घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी चेनय्या याच्यावर संशय घेतला होता. मात्र पुढील तपासात सत्य समोर आलं. पोलिसांनी जेव्हा घटनेच्या रात्रीच्या घटना क्रमाची तपासणी केली, तेव्हा राजिताने खूनाची योजना पूर्वनियोजित रचल्याचं स्पष्ट झालं. तिने काळजीपूर्वक संपूर्ण प्लॅन तयार केला होता. मोबाईल कॉल डिटेल्स, सोशल मीडियावरील संभाषणं, आणि रुग्णालयातील तपासणीतून सत्य समोर आलं.
समाजासाठी एक गंभीर इशारा
ही घटना समाजाला हादरवणारी आहे. एका महिलेने केवळ प्रेमसंबंधासाठी आपल्या मुलांचा असा क्रूर अंत करण्याचा विचार करावा, हे समाजातील नातेसंबंधांच्या अध:पतनाचं लक्षण आहे. आईच्या मायेवर विश्वास ठेवणाऱ्या बालकांना आपल्या आईकडूनच मृत्यू मिळणं हे कुठल्याही समाजासाठी काळजाला चिरकवणारं आहे.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
संगरेड्डी पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला असून, राजिता रुग्णालयातून बरी झाल्यानंतर तिला अटक केली जाणार आहे. तिच्या प्रियकराचाही तपास सुरू असून त्याच्याशी तिचे संबंध कितपत गहिरे होते, याचाही शोध घेतला जात आहे.