दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सुप्रिया सुळे यांची मागणी

राज्यात पावसाने ओढ दिली आहे. शेती व पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. जनावरांच्या चाऱयाचाही प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्जमाफी व दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर बोलताना त्या म्हणाल्या की, या मागणीसाठी मी आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पत्र पाठवले आहे.

हे सरकार शेतकरीविरोधी आहे अशी टीका करताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, कष्ट करणाऱया शेतकऱयांचे पंबरडे मोडण्याचे काम सरकारच्या धोरणातून होत आहे. कांद्याच्या प्रश्नावर मी मागील चार महिन्यांपासून बोलत आहे. देशात कांदा उत्पादन जास्त आहे. तर जगात कांदा कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीला परवानगी द्या, अशी मागणी मी केली होती. पण कांदा निर्यातीला परवानगी दिली नाही. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले.

कांदा निर्यातीवर चाळीस टक्के कर लावण्याचे पाप या सरकारने केले आहे. कॉर्पोरेट कर आणि उच्च उत्पन्न लोकांचा कर तीस टक्के आहे. मग शेतकऱयांवर चाळीस टक्के कर हा कोणता न्याय, असा सवालही त्यांनी केला.