मुंबई – विद्यापीठांतर्गत विविध परीक्षांना बसणाऱया विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत बारकोड, सीट क्रमांक चुकीचा लिहिल्यास यासाठी ब्लॉक पर्यवेक्षक आणि मुख्य संचालकांना जबाबदार ठरविण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तसे परिपत्रकच जाहीर केले असून विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर चुकीची माहिती आढळल्यास ब्लॉक पर्यवेक्षक आणि मुख्य संचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱया विविध परीक्षांचे निकाल विलंबाने जाहीर होत आहेत. त्यामुळे विद्यापीठाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. निकालाला होणाऱया विलंबाबाबत माहिती घेताना परीक्षा विभागाच्या असे निदर्शनास आले की, विद्यार्थी उत्तरपत्रिकेवर बारकोड, सीट क्रमांक लिहिताना चुका करतात. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी होऊनसुद्धा बारकोड, सीट क्रमांक चुकल्याने निकाल जाहीर करण्यास अडचणी येतात. याविषयी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी ब्लॉक पर्यवेक्षक आणि मुख्य संचालक यांच्यासाठी सूचना जारी केल्या आहेत.
येत्या काळातील परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवरील माहिती योग्यरीतीने भरली आहे का, यांची ब्लॉक पर्यवेक्षक आणि मुख्य संचालकांनी तपासणी करण्याच्या सूचना कारंडे यांनी दिल्या आहेत. प्राचार्यांनी महाविद्यालयांतील ब्लॉक पर्यवेक्षक आणि मुख्य संचालकांची बैठक घेऊन त्यांना उत्तरपत्रिकेवरील माहिती चुकीची भरली जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे सूचित केले आहे.