सुनसगाव – गोंभी शिवारातील १३२ केव्ही टॉवर लाईन चा विज खांब कोसळण्याच्या मार्गावर?

(खांबाच्या आजूबाजूची वाळूची चोरी ; अधिकारी अनभिज्ञ! )

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – येथून जवळच असलेल्या सुनसगाव – गोंभी शिवारात रेल्वे लाईन नजिक असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनचा खंबा पडण्याची शक्यता निर्माण झाली असून खांबाच्या आजूबाजूची वाळू काढून नेल्याने विज खांब पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, भुसावळ – जळगाव रेल्वे लाईन पासून व गोंभी गावापासून पाचपांडव पिंप्री शिवारातून १३२ केव्ही टॉवर लाईन गेलेली आहे. या टॉवर लाईन च्या सुनसगाव शिवार गट नंबर ११७ मध्ये एका विज खांबाच्या आजूबाजूची वाळू काही वाळू चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार गेल्या अनेक महिन्या पासून सुरू असण्याची शक्यता आहे. मात्र टॉवर लाईन चा खांब असलेला परिसर भुसावळ येथील सूज्ञ व्यक्तीने शेती म्हणून विकत घेतला असल्याने शेत पाहणीसाठी शेतात गेले असता वाळू चोरीचा प्रकार लक्षात आल्याची चर्चा या परिसरात सुरु असून विज वितरण कंपनीचे ठेकेदार असलेल्या एकाच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी तहसिलदार व पोलीस स्टेशन मध्ये या बाबत तक्रार दाखल केली असल्याचे बोलले जात आहे.

संबंधितांनी तक्रार दाखल केल्याने महसूल विभाग कामाला लागला असून घटनास्थळी कुऱ्हा पानाचे मंडळ अधिकारी संजय पाटील , सुनसगाव तलाठी सुनिता वळवी ,कोतवाल संजय गोसावी ,सुनसगाव पोलीस पाटील खुशाल पाटील , उपसरपंच एकनाथ सपकाळे ,सरपंच पती भोजू कोळी यांनी पाहणी केली आहे. या विज खांबा जवळून खरोखर वाळू, मुरुम काढून नेला असल्याचे व ट्रँक्टर सारख्या वाहनाचा वापर केला असल्याचे सांगितले जाते असून विज खांबाला लागून मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महसूल चे अधिकारी रात्री उशिरापर्यंत वाळू वाहतूकीचे वाहने शोधताना दिसत आहेत परंतु नेमकी कोणत्या गावच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू व मुरुम चोरट्यांनी हा प्रकार केला हे समोर येणे गरजेचे असून ‘चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार होऊ नये असे बोलले जात असून महसूल च्या कर्मचाऱ्यांनी सुनसगाव ग्रामपंचायतीला या टॉवर लाईनच्या विज खांबाला भराव टाकून द्यावा अशी मागणी केली असल्याचे बोलले जात असून सुनसगाव ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

वाळू व मुरुम काढून नेलेल्या या टॉवर लाईन च्या काही अंतरा पासून रेल्वे लाईन गेली आहे त्यामुळे रेल्वे गेल्यावर या विज खांबाची माती व रेती काही प्रमाणात घसरते असे काहींचे म्हणणे आहे.

ताजा खबरें