आदिपुरुषच्या संवादावरून नेपाळमध्ये वादळ

आदिपुरुष चित्रपट शुक्रवारी म्हणजेच 16 जून रोजी प्रदर्शित झाला. यातील अनेक बाबी प्रेक्षकांना खटकल्या असून त्यावरून प्रेक्षक या चित्रपटाला पुष्कळ ट्रोल करत आहेत. या चित्रपटातील एका संवादामुळे नेपाळही नाराज झाला आहे. नेपाळमधील काठमांडूच्या महापौरांनी या चित्रपटातील एका संवादावर नाराजी व्यक्त केली आहे. बालेंद्र शाह बालेन असं महापौरांचं नाव असून त्यांनी चित्रपट निर्मात्यांना हा संवाद चित्रपटातून वगळावा असा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी निर्मात्यांना 3 दिवसांची मुदत दिली आहे. चित्रपट निर्मात्यांचं म्हणणं आहे की हा संवाद नेपाळ सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने म्यूट करण्यात आला आहे.

प्रभू श्रीरामाची पत्नी सीतामातेचा जन्म नेपाळमध्ये झाला होता असं आतापर्यंत सांगण्यात आलं आहे. आदिपुरुष चित्रपटात मात्र सीतामातेचा जन्म हा हिंदुस्थानात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यामुळे नेपाळमधल्या काहींनी चित्रपटातील संवादावर आक्षेप नोंदवला आहे. जोपर्यंत हा संवाद हटवला जात नाही तोपर्यंत काठमांडूतील एकाही चित्रपटगृहात हा चित्रपट चालू दिला जाणार नाही.

ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र चित्रपट पाहून अनेकांच्या पदरी निराशा पडली आहे. कृती सॅनॉन आणि सैफ अली खान यांचा अभिनय सोडल्यास इतर कोणाताही अभिनय अनेक प्रक्षकांना आवडलेला नाही. रामाची भूमिका साकारणारा प्रभास हा चित्रपटात बहुतांश वेळ निर्विकार चेहऱ्याने वावरत असतो. युद्धाचे प्रसंग पाहताना आपण पुन्हा बाहुबली पाहतोय की काय असा भास होतो अशी काही प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात रामाच्या भूमिकेत अभिनेता प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन, हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे, तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे.

‘आदिपुरुष’ चा टीझर ज्यावेळी प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या व्हीएफएक्सवरून भरपूर टीका झाली होती. व्हीएफएक्समध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. तारीख पुढे गेली असली तरी व्हीएफएक्स अत्यंत सुमार दर्जाचे राहिले आहेत. चित्रपटातील अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या आहेत.

हनुमानाच्या शेपटीला आग लावल्यानंतर चित्रपटामध्ये जो संवाद दाखवला आहे तो ऐकून प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की हनुमानाच्या तोंडी असले छपरी संवाद का घुसवण्यात आले असावेत ?

विहिंपच्या नेत्या प्राची साध्वी यांनीही चित्रपटातील एक दृश्य ट्विट करत हे कोणतं रामायण आहे असा प्रश्न विचारलाय.

https://twitter.com/Sadhvi_prachi/status/1669755973538553856?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1669755973538553856%7Ctwgr%5Ec1dfc3674542431d5d2f5fe0ccc10927c266659d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fwww.saamana.com%2F

ताजा खबरें