सोलापूरचे फौजदार सिद्धाराम सोनार यांचा शेतात विजेचा झटका लागून मृत्यू

सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार सिद्धाराम माणिक सोनार (वय ५६) यांचा शेतात विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे घडली. साप्ताहिक सुटीमुळे ते आपल्या गावी आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सहायक फौजदार सोनार हे काही दिवसांची साप्ताहिक सुटी मिळाल्यानंतर आपल्या मूळगावी चपळगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने घरात राहून मुलाच्या सोयरिकीबाबत चर्चा करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सोनार यांनी ‘शेतात जाऊन येतो’ असे सांगून घरातून बाहेर पडले.

शेतात उसाला पाणी देण्यासाठी त्यांनी विहिरीतील विद्युत मोटार सुरू केली. पाणी देत असताना अचानकपणे त्यांना विजेचा तीव्र झटका बसला. झटका इतका जोरदार होता की, ते जागेवरच कोसळले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे त्यांची पत्नी अर्चना सोनार आणि दोन्ही मुले चिंतेत पडले. त्यानंतर शोध घेतला असता, शेवटी त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला.

या घटनेची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताजा खबरें