शिवसेना आमचीच आणि आम्ही शिवसेनाप्रमुखांचे वारसदार अशी बतावणी करणाऱ्या मिंध्यांची भाजपने पुरती कोंडी केली आहे. श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाली तर त्यांचे काम करणार नाही, असा पवित्रा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे मिंध्यांच्या पुत्राची उमेदवारी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नागपुरातून जाहीर केली. यानंतर कुछ तो गडबड है दया.श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की कमळावर अशा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण आणि ठाणे हे दोन्ही आमचे बालेकिल्ले आहेत असे भाजप नेत्यांनी मिंधेंना ठणकावत एक तर ठाणे आम्हाला द्या किंवा कल्याणवर पाणी सोडा अशी अट घातली आहे. त्यामुळे एकीकडे मिंधे राज्यातील उमेदवार जाहीर करत असतानाच ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर करू शकले नाहीत. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याण लोकसभा भाजपात प्रचंड नाराजी असल्याने त्याचा फटका श्रीकांत शिंदेंना बसेल याची पुरती जाणीव एकनाथ शिंदे यांना असल्याने कल्याणची उमेदवारी त्यांनी जाहीर केली नाही.
आज अखेर उपमुख्यमंत्री आणि भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली, पण फडणवीसांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी का जाहीर केली? शिंदे यांचा स्वतःचा कथित पक्ष असतानाही त्यांनी आपल्या पुत्राची उमेदवारी जाहीर का केली नाही? अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्यातून उमटल्या.
ही मिंध्यांची नामुष्की
मिंधे गट आम्हीच खरी शिवसेना अशी टिमकी वाजवते. मात्र त्यांना त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांची साधी उमेदवारी जाहीर करता येत नाही. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. ही मिंधे गटाची नामुष्की आहे अशी टीका इंडिया आघाडीच्या कल्याणमधील उमेदवार वैशाली दरेकर यांनी केली. फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केली असल्याने श्रीकांत शिंदे हे धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार की कमळवर असा सवालदेखील दरेकर यांनी केला आहे.
डुप्लिकेट ते डुप्लिकेटच
ज्यांच्या ताब्यात चोरलेला पक्ष आणि चिन्ह आहे ते स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत. त्यांच्या मुलाची उमेदवारी भाजपच्या नेत्यांना जाहीर करावी लागते. हे म्हणजे चोरलेल्या पक्षाची उमेदवारी तिसऱ्याने जाहीर करण्यासारखेच आहे. जगाच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना असेल. त्यामुळे डुप्लिकेट ते डुप्लिकेटच असतं असा घणाघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केला.