पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं असताना पाण्याचा स्तर वाढल्याने ते वाहून गेलं.

दरम्यान ते पाण्यात वाहून जात असतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत कुटुंब पाण्याच्या मधोमध उभे असल्याचं दिसत आहे. पाण्याचा स्तर आणि वेग जास्त असल्याने अखेर त्यांचा तोल जातो आणि सर्वजण एकत्र वाहत जाताना ते दिसत आहेत.

नेमकं काय झालं?

लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. यातील तिघांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरु आहे.

सीसीटीव्हीत नेमकं काय?

सीसीटीव्हीत कुटुंब पाण्याच्या मधोमध उभं असल्याचं दिसत आहे. यावेळी पाण्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. दुसरीकडे कुटुंब एकमेकाला घट्ट पकडून पाण्यातून वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असतं. दुसरीकडे बाहेर असणाऱ्यांपैकी काहीजण त्यांच्याकडे दोरी टाकत मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही वेळाने संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून जातं. पुढे गेल्यानंतरही ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांचा टीकाव लागत नाही.

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरलं आहे. पावसाळ्यात प्रसिद्ध पर्यटन ठिकाण असल्याने भुशी धरणवार लोक गर्दी करत असतात. पण अशावेळी नसतं धाडस करण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातो. पाण्यात जाण्याचा आणि त्यात फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. अशाच प्रयत्नात आपला जीव धोक्यात घालत आहोत याची अनेकांना जाणीव नसते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे.

माळशेज घाटात पावसानं पाठ फिरवली

पुण्यातील माळशेज घाटात पावसानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे विकेंडला येणा-या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. जून महिना संपत आला तरी माळशेज घाटात पाऊसच नसल्यानं धबधबे प्रवाहित झालेले नाहीत. याचा याठिकाणच्या व्यावसायिकांना फटका बसला आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्यानं व्यावसायिक अडचणीत आले आहे.

पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून आज पुणे ,सातारा सह संपूर्ण विदर्भ आणि मराठवड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज आणि उद्या पुणे शहरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ताजा खबरें