पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपला हद्दपार करा; शरद पवार यांचे आवाहन

देशाची घटना बदलण्यासाठी भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. पण घटना बदलण्याची हिंमत कुणातही नाही. प्रत्येक ठिकाणी स्वतःची मनमानी भाजपचे नेते करीत असून मोदींची एकाधिकारशाही संपवण्यासाठी त्यांना कायमचे हद्दपार करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भिवंडीत महाविकास आघाडीच्या दणदणीत प्रचार सभेत केले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शरद पवार यांनी भाजपच्या हुकूमशाही कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मंदिर व मशीद सुरक्षित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण भाजपचे नेते जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करीत असून हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही शरद पवार यांनी ठामपणे सांगितले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, आरपीआयचे श्याम गायकवाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख विश्वास थळे, काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर आदी उपस्थित होते.

तेव्हाच पुन्हा तुरुंगात जाईन
आपचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही या सभेत भाषण झाले. मोदी व भाजप यांच्यावर टीकेचा आसूड ओढताना त्यांनी सांगितले की, निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यामुळे मोदींनी मला खोट्या केसेसमध्ये अडकवून तुरुंगात टाकले. सध्या मी जामिनावर बाहेर आहे. पण दिवस- रात्र मेहनत करून भाजपला पराभूत केल्यानंतरच पुन्हा तुरुंगात जाईन. भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे हे भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.

सुबह से लेकर झूठ ही झूठ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी सांगितले की, ही निवडणूक गावकीची नव्हे तर भावकीची असून लोकशाही वाचवण्याची गरज आहे. लाखों का चष्मा… करोड का सूट, सुबह से लेकर झूठ ही झूठ अशा शब्दांत ज्योती ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.