त्यांच्याकडून ‘गद्दार दिवस’ साजरा करणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’
मुंबई – इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्याशी गद्दारी केलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मांडीवर बसून सत्तेसाठी भाजपशी गद्दारी करुन काँग्रेसशी हातमिळवणी करणा-या उद्धव ठाकरे यांनी आता आम्हाला गद्दारीची भाषा शिकवण्याचा हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे. त्यांच्याकडून गद्दार दिवस साजरा करणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार असल्याची खिल्ली शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उडवली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर!
त्याबरोबर ठाकरे गटातील अनेकजण शिंदे गटात येत असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखिल भाजपच्या वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील केवळ रडायचे नाटक करत होते, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. जे जयंत पाटील आज स्वत:च भाजपच्या वाटेवर आहेत ते म्हणतात पक्षाची स्थापना गद्दारीतून झाली आहे. आम्ही त्यांची चिंता करत नाही, असेही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
शिरसाट म्हणाले की, ‘जयंत पाटील इतके का रडत होते, तुम्हाला माहीत आहे का? कारण त्यांना माहीत आहे, उद्या काय घडणार आहे ते शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला तर मी काय करू? मी तर मेलोच, म्हणून ते ओक्साबोक्शी रडत होते बाकी काही नाही, ते राजीनामा दिल्यामुळे रडत नव्हते. त्यांचं रडणं वेगळं होतं. हे असे बोलणारे पटकन उड्या मारतात, म्हणून थोडे दिवस तुम्ही वाट पहा, तुम्हाला जयंत पाटील यांचं मार्गक्रमण कुठे तरी झालेलं दिसेल असंही संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर संजय शिरसाट यांनी केलेल्या या दाव्यावर आता जयंत पाटील काय उत्तर देणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.