जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्यांशी सामान्य (व्यंग नसलेला) व्यक्तीने विवाह केल्यास प्रोत्साहनपर म्हणून ५० हजारांचे अनुदान दिले जाते.
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या विविध योजना राबविल्या जातात. यात उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे, वेंडींग स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, फूड प्रोसेसिंग युनिट, झेरॉक्स मशीन आदी साधने विकत घेण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अनेक दिव्यांग आत्मनिर्भर झाले आहेत. अपंग व्यक्तींसाठी विनाअट घरकुल, अशा विविध योजनांचा समावेश आहे.
किती मिळते अनुदान ?
या योजनेतील मिळणारी रक्कम ५० हजार रुपये आहे. यातील २० हजार रूपये रोखीने, तर ३० हजार रुपये डिपाझीट केले जातात.
हे आहेत निकष
दिव्यांग व्यक्ती किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असणे आवश्यक आहे. या योजनेनुसार अपंग व्यक्तीने सामान्य व्यक्तीशी किंवा सामान्य व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी लग्न केले, तर या जोडप्याला ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
कोणाला मिळतो लाभ ?
महाराष्ट्रातील रहिवासी, लाभार्थी विवाहित असावा. ४० टक्क्यांहून जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडल्यास हा लाभ मिळू शकतो. हे अनुदान मिळविण्यासाठी जोडप्यापैकी एक जण दिव्यांग किंवा अपंग असावा लागतो.
“सामान्य व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी किंवा दिव्यांग व्यक्तीने सामान्य व्यक्तीशी विवाह केल्यास त्या जोडप्याला समाज कल्याण विभागातर्फे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. ही दिव्यांग अव्यांग विवाह योजना आहे.”-विजय रायसिंग, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव