मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटपात घोटाळ्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत अडकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे.
माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जे उमेदवार (अमोल कीर्तीकर) आहेत, खिचडीचोर.. त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीनंतर ईडी काय करेल मला माहिती नाही, पण खिचडीचोराविरोधात निश्चितपणे कारवाई व्हायला हवी”, असे निरुपम सुरूवातीला म्हणाले.
संजय निरुपम पुढे म्हणाले की, “खिचडी चोर आणि खिचडी घोटाळ्यावर मी काम सुरू केलं, तेव्हा हे माहिती पडलं की, याचा मुख्य सूत्रधार दुसराच कुणीतरी आहे. खिचडी घोटाळ्याचा जे मुख्य सूत्रधार आहे, ते शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत.”
राऊतांनी मुलगी, भाऊ आणि भागीदाराच्या नावावर पैसे घेतले -निरुपम
तेव्हा हे आढळून आलं की, त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे लाच घेतली आहे. बिल्डरकडून पैसे घेतले. यात पत्नीला आणायला नको होतं. आता हा जो घोटाळा केला आहे, त्यात त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि त्यांचा जो भागीदार आहे, त्याच्या नावे पैसे घेतले आहेत”, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
खिचडी वाटपाचे कंत्राट मिळालेल्या कंपनीकडून घेतले 1 कोटी
“सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी आहे, ज्यात राजीव साळुंखे आणि सुजित पाटकर हे आहेत. त्या कंपनीला ६ कोटी ३७ लाख रुपयांचे खिचडी पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते. या कंपनीकडून संजय राऊत यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्या मित्रांनी १ कोटी रुपये दलाली म्हणून घेतले”, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.