साक्रीत दरोडा, दागिने लुटीसह 23 वर्षीय युवतीचे अपहरण

धुळे – पाच ते सात दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली. या घटनेत २३ वर्षीय युवतीचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

साक्री येथे रात्री ही घटना घडली.

उपलब्ध माहिती नुसार साक्री शहरातील विमलबाई महाविद्यालयाच्या पाठीमागे ज्योत्स्ना पाटील (वय ४० वर्षे) यांचे घर आहे.या ठिकाणी रात्री साडेदहा वाजता पाच ते सात दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत ज्योत्स्ना पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली व दागिन्यांसह जवळपास ८८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लांबविला.

दरोडेखोर हिंदी भाषिक होते. त्यांनी ज्योत्स्ना पाटील यांच्या भाचीला ताब्यात घेतले आणि ज्योत्स्ना यांना घरात कडीबंद करून त्यांच्या २३ वर्षे वयाच्या भाचीचे अपहरण केले. साक्री शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून दरोडा व अपहरणाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच साक्री शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी चार विशेष पथके संशयित दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना केली आहेत

ताजा खबरें