….तर भारतात कथा होऊ देणार नाही, पंडित प्रदीप मिश्रा यांना साधूसंताचाच इशारा

अयोध्या : भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची पवित्र प्रेमकहाणी अजरामर आहे. मात्र, आता राधा रानी संदर्भात प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदिप मिश्रा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.

यामुळे अयोध्येतील संत समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कथावाचक प्रदीप मिश्रा यांनी आपल्या एका कथेमध्ये भक्तांना विचारले की, राधा रानी कुठल्या रहिवासी आहेत, तर भक्तांनी बरसाना हे उत्तर दिले.

पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या कथेदरम्यान, राधारानी यांच्या माहेरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की, राधाराधी बरसाना येथील नव्हत्या. श्रीकृष्णाच्या पत्नींमध्ये राधा रानी यांचे नाव नाही आहे. राधाजी यांचे लग्न छात्रा गावात झाले होते. त्यांच्या या विधानानंतर अयोध्येतील संतांनी तीव्र संताप व्यक्त करत कथा वाचक प्रदीप मिश्रा यांच्या या विधानावर टिका केली.

तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगत गुरु परमहंस आचार्य यांनी म्हटले की, ज्याप्रकारे कथा वाचक प्रदीप मिश्रा यांनी विधान केले आहे, त्यामुळे संपूर्ण संत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे 10 दिवसाच्या आत प्रदीप मिश्रा यांनी देशातील सर्व साधू संतांची माफी मागावी अन्यथा त्यांची कथा भारतात होऊ देणार नाही, असा इशाला जगत गुरु परमहंस आचार्य यांनी कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांना दिला.

मुघलांच्या काळात धार्मिक ग्रंथांची छेडछाड –

तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य हे पुढे म्हणाले की, कथा वाचक प्रदीप मिश्रा यांनी जे विधान केले आहे, त्यामुळे संत समाज दु:खी झाला आहे. त्यामुळे मी प्रदीप मिश्रा यांना हे सांगू इच्छितो की, जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर त्यांनी आपल्या या विधानाबाबत माफी मागावी. मुघलांच्या काळात आमच्या धार्मिक ग्रंथांसोबत छेडछाड करण्यात आली. तिथे तुम्ही वाचले असेल. मात्र, प्रदीप मिश्रा यांनी विचार करुन विधान करायला हवे. प्रदीप मिश्रा यांना 10 दिवसांच्या आत माफी मागावी लागेल. जर त्यांनी आपल्या विधानासंदर्भात माफी मागितली नाही तर त्यांची कथा भारतात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

तसेच राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले की, धार्मिक ग्रंथांनुसार, राधा रानी बरसाने येथील होती. शास्त्रांत याचे वर्णनही आहे. राधा रानी यांचे घर बरसाना येथे होते, हे सर्व लोकांना माहिती आहे. तसेच भगवान कृष्ण आणि राधा रानी यांचे नाते शाश्वत आहे.

वादग्रस्त विधानं प्रदीप मिश्रा यांची जुनी सवय

राष्ट्रवादी बाल संत दिवाकर आचार्य हे म्हणाले की, प्रदीप मिश्रा चांगले कथा वाचक आहेत. मात्र, संपूर्ण देशात त्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून ते सातत्याने वादग्रस्त विधाने करतात. त्यांनी असे करू नये. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. राधा रानी या बरसाना येथील आहेत, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळे प्रदीप मिश्रा यांनी राधा रानीबाबत असे विधान करणे म्हणजे संपूर्ण संत समाजाला दुखावण्यासारखे आहे, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.