रस्ते अपघात वाढले! अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देणाऱ्या पालकास होईल ३ वर्षांचा कारावास

मुंबई – अडीच वर्षांत दीडशेहून अधिक जणांचा शहर हद्दीत रस्ते अपघातात मृत्यू झाला असून त्यात अल्पवयीन वाहनचालक देखील आहेत. दरवर्षी सरासरी १३ हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतोय.

या पार्श्वभूमीवर १६ वर्षांपर्यंतच्या मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केल्यास त्याच्या पालकाला मोटार वाहन कायद्यानुसार तीन वर्षांचा कारावास व २५ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा होईल. तसेच संबंधित चालकाला व वाहनाच्या मूळ मालकास प्रत्येकी पाच हजाराचा दंड भरावा लागणार आहे.

दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढतच असून त्याला वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आता विशेष मोहीमांच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन आखले आहे. महाविद्यालयांबाहेर तशा अल्पवयीन मुलांवर वाहतूक पोलिसांचा वॉच असणार आहे.

शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकीला परिसरनिहाय ताशी ३० ते ४० किमी वेगाची मर्यादा असून जड वाहनांसाठी ताशी २० किमी तर तीन व चारचाकी वाहनांना ताशी ३० किमीपर्यंत वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सर्रास वाहनचालक त्याचे पालनच करीत नाहीत. विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली असून त्यात अल्पवयीन चालकांचाही समावेश आहे. दुचाकीस्वार स्वत:च्या सुरक्षिततेसाठी देखील हेल्मेट वापरत नाहीत. त्यांच्यावर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.

बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त महत्त्वाची

शहर हद्दीतील बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी, यासाठी दहा-पंधरा दिवसातून एकदा नाकाबंदी करून विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांनामार्चएण्डचे टार्गेट वगैरे असे काही नसते, अपघात रोखणे हाच कारवाईचा मुख्य उद्देश असतो.

‘या’ बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष

ताशी २० ते ४० किमीपर्यंत वेगाची मर्यादा असतानाही वेगमर्यादा ओलांडणारी वाहने

रस्त्याच्या विरूद्ध दिशेने धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे

मद्यपान करून किंवा मोबाईलवर बोलत वाहन चालवणे

फॅन्सी नंबरप्लेट व दुचाकीवर ट्रिपलसीट तथा चारचाकीत सीटबेल्टचा वापर न करणे

वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही बिनधास्तपणे वाहन चालवणारे चालक

jalgaonsandesh

jalgaonsandesh