मुंबई – आरबीआयने (RBI) नुकतीच आयडीएफसी फस्ट बँकेवर तसेच एलआयसी हाऊसिंग फायनान्सवरही मोठी कारवाई करुन दंड ठोठावला होता. त्यानंतर आता लगेचच शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर देखील आरबीआयने कारवाई केली आहे. या बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे आता कोणालाही या बँकेत गुंतवणूक करता येणार नाही. तसेच पुढील सहा महिने बँकेतून पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
आरबीआयच्या कारवाईनुसार शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. दरम्यान, या बँकेत पैसे जमा केलेले ग्राहक विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करु शकतात. ज्या ग्राहकांच्या खात्यात ५लाख रुपयापर्यंत रक्कम आहे, त्यांना संपूर्ण पैसे मिळू शकतात.