ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? राज ठाकरे यांचं रोखठोक उत्तर!

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर वर्षभराचा काळ उलटला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे देखील सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे विरोधात आणि सरकारमध्ये कोण आहे, हेच कळत नाही, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

अशा परिस्थितीत दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्राला ठाकरे बंधू एकत्रित येण्याची गरज आहे, अशी चर्चा सुरु आहे.

विशेष म्हणजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीतही मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असा सूर मनसे नेत्यांमध्ये दिसला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आज स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या वेळी त्यांनी ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं.

राज ठाकरे म्हणाले की, आमच्या बैठकीत अशी कुठलीही मागणी झाली नाही. आता या सगळ्या गोष्टींवर तुम्ही ठाम असाल तर हे असंच वागतील, नाही का? तुम्ही पत्रकार असं बोलायला लागलात तर या लोकांना हे सर्व हवं आहे. मला असं वाटतं तुम्ही कुठेतरी ठाम राहणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी मूळ प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

काही दिवसांपूर्वी एका मराठी वाहिनीवर झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी राज ठाकरे यांना याबाबतचा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी आपण उद्धव ठाकरे यांना राजकारणात एकत्र येण्यासाठी साद घालण्याचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही, असं राज सांगितलं.

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे जेव्हा आजारी पडले होते तेव्हा राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी गेले होते. उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव यांची गाडी चालवली होती. संबंधित प्रसंगाची वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होते.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh