राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार !

राहुल गांधी हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठीचे विरोधी पक्षांचे उमेदवार असतील, असा दावा काँगेस नेते कमलनाथ यांनी केला आहे. पदयात्रेमुळे राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. जगात आजवर कोणीही 3,500 किलोमीटर इतकी मोठी पदयात्रा केलेली नाही. यासाठी त्यांचे कौतुक करावयास हवे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

कमलनाथ हे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जेव्हा गांधी यांची यात्रा तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या दक्षिणेतील राज्यांमधून जात होती, तेव्हा ती महाराष्ट्रात अपयशी होईल, असे भाकित भाजप नेते करीत होते. मात्र, महाराष्ट्रात यात्रा मोठय़ा प्रमाणावर यशस्वी झाली तेव्हा ती हिंदी पट्टय़ात अपयशी होईल अशी भविष्यवाणी केली गेली. मात्र, या भागातही यात्रा यशस्वी झाल्याने भाजपची कोंडी झाली आहे. यात्रेला सर्व स्तरांमधील लोकांचे समर्थन मिळत आहे, असे प्रतिपादन कमलनाथ यांनी केले.

त्यांना दरवाजे बंद

ज्यांनी पक्षाचा विश्वासघात केला आहे, ज्यांनी कार्यकर्त्यांना दुखावले आहे आणि ज्यांनी तत्वशून्य तडजोडी केल्या आहेत, त्यांना काँगेसचे दरवाजे पूर्णतः बंद आहेत, अशी टिप्पणी त्यांनी ज्योतिरादित्य सिंदिया यांचा नामोल्लेख न करता केली. मात्र, सिंदिया यांचे काही सहकारी काँगेसमध्ये पुन्हा प्रवेश करु शकतात. त्यांना पक्ष सामावून घेण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh