दक्षिण गाझामधील राफाह परिसरात रविवारी झालेल्या इस्रायली हल्ल्यात किमान २६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गाझा पुन्हा एकदा धास्तावले आहे.
ही घटना अल-आलम राउंडअबाऊटजवळ घडली, जिथे हजारो पॅलेस्टिनी नागरिक अमेरिकेच्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन (GHF) च्या मदत केंद्राजवळ अन्नासाठी एकत्र जमले होते. त्याच वेळी इस्रायली टँकांनी प्रवेश करत अचानक गोळीबार केला, असे स्थानिक सूत्रांनी सांगितले.
या हल्ल्यानंतर अनेक जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी वाहनांची कमतरता होती. BBC च्या अहवालानुसार, नास्सर हॉस्पिटलमध्ये जखमींना गाढवांच्या गाड्यांवरून नेले गेले.
हमासची प्रतिक्रिया:
घटनेनंतर हमासने इस्रायलवर टीका करताना हा हल्ला “भुकेल्या नागरीकांवरचा नरसंहार” असल्याचे म्हटले. त्यांनी मदत वितरण केंद्रांना “मृत्यूचे सापळे” असे संबोधले.
GHF व UN वाद:
GHF, एक खाजगी संस्थान असून, अमेरिका व इस्रायलच्या पाठिंब्याने २६ मेपासून गाझामध्ये अन्नवाटप करत आहे. त्यांनी नुकतीच घोषणा केली की त्यांनी आतापर्यंत २.१ दशलक्ष जेवणांचे वाटप केले आहे.
परंतु संयुक्त राष्ट्र व अन्य आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी GHF च्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. त्यांच्या मते, ही मदत योजना मानवतावादी तत्वांना विरोध करणारी असून ती इस्रायली लष्करी उद्दिष्टांची पूर्तता करत आहे.
UN चा इशारा:
UN वर्ल्ड फूड प्रोग्रामने इस्रायलला गाझामध्ये अधिक अन्न मदतीची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. “लोकांची हतबलता वाढत आहे आणि त्यामुळे सुरक्षा धोकेही वाढले आहेत”, असे त्यांनी स्पष्ट केले.