मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. आता या निर्णयाला महायुतीच्याच नेत्यांमधून विरोध होत आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही महायुती सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसे झाले तर उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराच डॉ. किरण लहामटे यांनी महायुती सरकारला दिला आहे.
डॉ. किरण लहामटे म्हणाले की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ४७ जमातींना आरक्षण दिले आहे. त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणी पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही. त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसे झाले तर उग्र स्वरूपाचे आंदोलन केल जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, नरहरी झिरवाळ म्हणाले की, हा विषय वर्षानुवर्षे सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यावर आमचे दुमत नाही. पण आमच्यातून आरक्षण देऊ नये. माझी सरकारला विनंती आहे की, जसे त्यांना बोलावले जाते तसे आम्हालाही बोलवावे. आमचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना बैठकीला बोलवायला हवे होते. मी विधानसभा उपाध्यक्ष असल्याने सर्व समाजाचे माझ्याकडे लक्ष आहे. आदिवासींच्या धर्तीवर आरक्षण देऊ असे म्हटले होते. पण आदिवासींमधूनच आरक्षण देण्याचा अट्टहास का? सरकारच्या निर्णयाविरोधात आदिवासी आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील.