निवडणूक आयोगाकडून दिशानिर्देश : हवामान विभागाकडून उष्मालाटेचा इशारा
नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाने आगामी काही काळात मागील वर्षाच्या तुलनेत अधिक उष्णता राहणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. तसेच यंदाचा उन्हाळा अधिक लांबण्याची शक्यता आहे. देशात याचदरम्यान 19 एप्रिलपासून 1 जूनपर्यंत 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशा स्थितीत मतदानादरम्यान लोकांना उष्णतेच्या लाटेपासून वाचविण्यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रांवर मतदार, पोलिंग पार्टी आणि पोलिंग एजंटांना उष्णतेपासून वाचविण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. देशातील सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर असावीत. कुठलेही मतदान केंद्र तळमजल्याच्या वरील मजल्यावर स्थापन केले जाऊ नये, जेणेकरून सर्वप्रकारच्या मतदारांना सहजपणे मतदान केंद्रात जात मतदान करता येईल असे निवडणूक आयोगाने सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या तीन रांगा निर्माण केल्या जाव्यात. यातील एक पुरुष, दुसरी स्त्रियांसाठी आणि तिसरी वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांसाठी असावी. गरजेनुसार दोन महिलांनंतर एक पुरुष मतदाराला मतदान करण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घ्यावा असे आयोगाने दिशानिर्देशात म्हटले आहे.
दर दोन किमीवर मतदान केंद्र
मतदारांवर स्वत:च्या घरांपासून अत्यंत अधिक अंतरावर जात मतदान करण्याची वेळ येऊ नये यासाठी दर दोन किलोमीटरच्या कक्षेत मतदान केंद्र स्थापन करण्यात यावे. यात रॅम्प देखील निर्माण केले जावेत, यामुळे वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना स्वत:चा मतदानाचा हक्क सहजपणे बजावता येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर पुरुष-स्त्राr आणि दिव्यांग मतदारांचा विचार करून स्वच्छतागृहाची सुविधा असावी. तसेच बसण्यासाठी पुरेशा संख्येत खुर्च्या आणि बेंच ठेवण्यात यावेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पेयजलची व्यवस्था करण्याचे निर्देश राष्ट्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
वाहतुकीचीही असणार व्यवस्था
जर एखादा वृद्ध, दिव्यांग मतदार स्वत:च्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत जाण्यास सक्षम नसेल तर त्यांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि तेथून परत घरी सोडण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी लागणार आहे. मॉडेल मतदान केंद्र स्थापन केले जाणार आहे. मतदारांच्या लांब रांगा निर्माण झाल्यास त्यांना उष्णतेपासून वाचविण्यासाठी हे तंबू उभारण्यात येतील. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देण्यासाठी पुरेसे दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत.