फौजदाराचा हवालदार झाला, कशाला आमची मापे काढता! जयंत पाटील

मुंबई – भाजपने तुम्हाला फौजदारावरून हवालदार केले आणि तुम्ही आमची मापे काढावी का, असा खोचक सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.राष्ट्रवादी हा साडेतीन जिह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकातून या पक्षाचे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याचा निपाणीतील सभेत जयंत पाटील यांनी समाचार घेतला. ‘महाविकास आघाडीचे चांगले चाललेले सरकार कारस्थान करून पाडण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केले. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, या आशेने त्यांनी हे कारस्थान रचले. मात्र दिल्लीने दुसऱ्यालाच मुख्यमंत्रीपद दिले आणि यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळेच ज्याला भाजपने फौजदारावरून हवालदार केले त्याने दुसऱ्यांची मापे काढू नये, असा टोला जयंत पाटील यांनी हाणला. देशात हुकूमशाही वाढली आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना गप्प बसवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधताना कर्नाटकात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

मग आम्हाला का घाबरता – अजित पवार

आमच्या पक्षाची किंवा पक्षातील लोकांची चिंता फडणवीसांनी करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांकडे पाहावे. आम्ही जर साडेतीन जिह्यांपुरते मर्यादित असू तर तुम्ही चिंता कशाला करता,आम्हाला का घाबरता, असा सवाल अजित पवार यांनी केला.