मालाडमध्ये ख्रिसमस बंदोबस्तादरम्यान पोलिसावर हल्ला, आरोपी फरार

२४ डिसेंबर रोजी, ख्रिसमससाठी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहायक फौजदार माणिक सावंत आणि त्यांचे सहकारी अंमलदार गायकवाड रामचंद्र स्टेशन लेनवरून गस्त घालत होते. काचपाडा जंक्शनजवळ वाहतूककोंडी झाल्याचे लक्षात येताच सावंत आणि गायकवाड हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

तेथे अरुण हरिजन हा वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे आढळले. सावंत यांनी त्याला रस्त्याच्या कडेला जाऊन शांत राहण्याचे सांगितले. मात्र, हरिजनने त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

शिवीगाळ करणाऱ्या अरुण हरिजनकडे दुर्लक्ष करून सावंत आणि गायकवाड यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हरिजनने सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या उजव्या कानावर लाकडी दांड्याने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यामुळे सावंत चक्कर येऊन खाली कोसळले.

गायकवाड यांनी तत्काळ सावंत यांना पोलिस वाहनातून रुग्णालयात दाखल केले. सध्या सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत, आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर, मालाड पोलिस ठाण्यात आरोपी अरुण हरिजनविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५२, १३२, आणि १०९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिस हरिजनचा शोध घेत आहेत.

या घटनेवर बोलताना मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, “पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत आम्ही अत्यंत गंभीर आहोत. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल. नागरिकांनी पोलिसांशी सहकार्य करावे.

ताजा खबरें