भगव्या कारमधून पीएम मोदींचा कर्नाटकात साडेतीन तास ‘रोड शो’, ‘जब तक हिंदू रहेगा तब तक मोदी रहेगा’ घोषणा

बेंगळुरू – कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरू मध्ये 26 किलोमीटरचा रोड शो केला. बेंगळुरू दक्षिणेतील सोमेश्वर भवन आरबीआय ग्राउंड ते मल्लेश्वरमच्या सांके टॅंकपर्यंतचा रोड शो सुमारे साडेतीन तासांत पार पडेल,असे नियोजन करण्यात आले होते.

या रोड शो ला चांगला प्रतिसाद मिळाला.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्सवी वातावरण दिसून आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या स्वागताची ठिकठिकाणी जय्यत तयारी केली होंती. त्यांच्यावर अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली.

आजचा रोड शो दक्षिण आणि मध्य बेंगळुरूच्या काही भागांतून नेण्यात आला. या भागातील 12 विधानसभा मतदार संघांमध्ये याद्वारे संपर्क अभियान राबवण्यात आले. पंतप्रधानांसोबत बेंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या आणि बेंगळुरू मध्यचे खासदार पी सी मोहन आणि अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

रोड शोच्या मार्गावर सुरक्षेसाठी बॅरिकेड्‌स व्यवस्था करण्यात आली तसेच सुरक्षा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. रोड शो चा मार्ग भगव्या रंगांनी सजवण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा भाजपचे झेंडे उभारण्यात आले होते आणि पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि समर्थकही भगवी शाल आणि टोप्या परिधान करून उभे होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, जब तक हिंदू रहेगा तब तक मोदी रहेगा, अशा घोषणाही दिल्या.

या मार्गावर काहीं ठिकाणी सांस्कृतिक पथकेही तैनात करण्यात आली होती. उद्या रविवारी मोदींचा थिप्पासंद्रा ते ट्रिनिटी सर्कल येथील केम्पेगौडा पुतळा दरम्यान सुमारे 10 किमी अंतराचा छोटा रोड शो होणार आहे.आधीच्या नियोजनानुसार आज शनिवारी एकाच दिवसात हा 36 किमीचा रोड शो होणार होता. परंतु लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तो शनिवारी आणि रविवार असा दोन दिवस विभागण्यात आला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh