पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गटाचा दावा, निवडणूक आयोगाकडे धाव

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर आता त्यांनी थेट पक्ष व पक्ष चिन्हावर दावा केला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष व चिन्ह आमचेच असल्याचा दावा देखील केला.

आता त्यासाठी ते निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहेत. बुधवारी अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयात समर्थकांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीनंतर अजित पवार गट पक्ष व चिन्हावर दावा ठोकणारी याचिका निवडणूक आयोगात दाखल करणार असल्याचे समजते.

दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडूनही निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. ‘निवडणूक आयोगाने पक्षावर व चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजूही ऐकून घ्यावी असे या कॅव्हेटमधून सांगण्यात आले आहे.

मुंबईत आज राष्ट्रवादीच्या दोन बैठका होत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली आहे तर एमईटी वांद्रे येथे अजित पवार यांनीही अशीच बैठक बोलावली आहे. . या बैठकांसाठी दोन्ही बाजूंनी जोर लावण्यात आला असून यानिमित्ताने शक्तिप्रदर्शनच पाहायला मिळत आहे.

पक्षाच्या घटनेमुळे दादा गटाची गोची

राष्ट्रवादीच्या घटनेत कार्याध्यक्ष हे पद नाममात्र आहे व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडेच सर्वाधिकार असतील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. पक्षात कोणत्याही नेमणुकीचे अधिकार फक्त राष्ट्रीय अध्यक्ष यांनाच आहेत. त्यामुळेच कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेले निर्णय आणि केलेल्या नेमणुकांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.