पंकजा मुंडे अडचणीत? ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीरंगात आली असतानाच भाजप नेत्या आणि बीडच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे आणि रविकांत राठोड यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. रविकांत राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून त्यांनी ऐनवेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. रविकांत राठोड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, राठोड यांनी पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून निवडणुकीतून माघार घेतल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पंकजा मुंडे आणि रविंकात राठोड यांच्यात झालेल्या त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यात पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून राठोड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतकंच नाही तर बंजारा समाजाची मते ही मलाच मिळणार आहेत. मात्र, त्यातली पाच-दहा हजार मते घेऊन फार काही होणार नाही, असे पंकजा मुंडे या रविकांत राठोड यांना सांगत आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर रविकांत राठोड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता उभय नेत्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे आणि रविकांत राठोड यांच्या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद

बीड जिल्ह्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला असताना निवडणुकीत आपल्याला सहकार्य करावे, असे पंकजा मुंडे या रविकांत राठोड यांना सांगत आहे.

पंकजा मुंडे यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना विनंती केली. तुमची संपूर्ण काळजी घेण्यात येईल, असे देखील आश्वासन दिले. विशेष म्हणजे महामंडळाच्या संदर्भातील तुमच्या त्या कामाला मी सहकार्य करेल, असे सांगून पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना लोकसभा निवडणुकीत आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.