मु्ख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

मुंबई – राज्यात आषाढी एकादशीचा मोठा सोहळा सर्वत्र साजरा केला जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे विठ्ठलाची महापुजा संपन्न झाली आहे. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी राज्यात भरपूर पाऊसपाणी पडू दे, माझा शेतकरी राजा सुखी-समाधानी राहो असं साकडंही यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.

मुख्यमंत्र्‍यांसह आणखी एका जोडप्याला या पुजेला बसण्याचा मान मिळतो. यावेळी हा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे आणि त्यांची पत्नी आशा अहिरे यांना मिळाला.

पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. या सोहळ्यासाठी तब्बल पंधरा लाखाहून अधिक भाविक पुंडलिक नगरीत दाखल झाले आहेत. आपल्या लाडक्या विठुरायाला याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी भक्त आसुसलेले असतात. गेल्या अनेक दिवसांपासून चालत आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी वारकरीही पंढरपुरात दाखल झाले आहेत.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्‍यांसह राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते.