पहलगाम दहशतवादी हल्ला: 26 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा बळी

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील शांततेच्या प्रतीक मानल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये एक भयावह दहशतवादी हल्ला घडला. या हल्ल्यात एकूण 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून, महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

हा हल्ला मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास झाला, जेव्हा पर्यटकांची बस पहलगाम परिसरातील प्रसिद्ध स्थळे पाहण्यासाठी जात होती. त्या वेळी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. काही सेकंदांतच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले.

दहशतवाद्यांनी बस थांबवून प्रवाशांची नावे आणि धर्म विचारले आणि नंतर थेट गोळीबार केला. या हल्ल्यामुळे अनेकांचे मृत्यू जागीच झाले, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील मृत पर्यटकांची माहिती:

या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे:

  1. अतुल मोने – डोंबिवली

  2. संजय लेले – डोंबिवली

  3. हेमंत जोशी – डोंबिवली

  4. संतोष जगदाळे – पुणे

  5. कौस्तुभ गणबोटे – पुणे

  6. दिलीप देसले – पनवेल

याशिवाय, महाराष्ट्रातील एस. बालचंद्रू, सुबोध पाटील आणि शोबीत पटेल हे हल्ल्यात जखमी झाले आहेत.

डोंबिवलीतील तिघे मित्र एकत्र काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर हृदयविदारक परिस्थिती निर्माण झाली. पुण्यातील संतोष आणि कौस्तुभ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पनवेलचे दिलीप देसले हे हल्ल्याच्या ठिकाणी मृत्युमुखी पडले.

इतर राज्यांतील मृतांचे तपशील:

या हल्ल्यात तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश-हरियाणा, युएई आणि नेपाळ येथील पर्यटकांचाही समावेश आहे. सर्व मृत पुरूष असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.

हल्लेखोरांची ओळख:

या हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलासा झाला आहे. या हल्ल्यामागे चार पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या चेहऱ्याचे फोटो जारी केले आहेत. हे फोटो सीसीटीव्ही फुटेजमधून घेतले गेले असून, त्यात दहशतवाद्यांचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. या हल्ल्याची योजना गेल्या दोन आठवड्यांपासून रचली जात होती. पाकिस्तानातून आलेल्या हल्लेखोरांनी काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने हा भयानक हल्ला अंमलात आणला.

हे चार दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचल्यावर त्यांनी स्थानिक भागात लपून गोळीबारासाठी योग्य वेळ आणि ठिकाण निवडलं. नाव आणि धर्म विचारून हल्ला करण्यात आल्याने यामागे धार्मिक विद्वेष असल्याचं संकेत मिळत आहेत.

देशभरातून संताप:

या भयानक घटनेमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे. सोशल मिडियावर लोकांनी निष्पापांचा बळी जाणाऱ्या या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. विविध राज्यांतील नेत्यांनी शोक व्यक्त केला असून, केंद्र सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

काश्मीरमधील नागरिकांचा निषेध:

विशेष बाब म्हणजे, काश्मीरमधील अनेक नागरिकांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. सोशल मिडियावरून त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत, शांतताप्रिय काश्मीरचं नाव काळवंडल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

काय म्हणतं प्रशासन?

जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले असून, सुरक्षा यंत्रणांना हल्लेखोरांचा शोध घेण्यास सक्रिय केलं आहे.