मुंबई – कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० किलोमागे अवघे २ ते ३ रुपये मिळाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.
याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्राह अनुदान (Subsidy for Onion Farmers) मिळणार असल्याचे आज त्यांनी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच सांगितले.
कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. कांदा उत्पादन राज्याचा ४३ टक्के हिस्सा आहे. खरीब, रब्बी हंगामात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. लेट खरीब हंगामातील लाल कांद्याची आवक सध्या बाजारात आहे. देशातील इतर राज्यातही कांद्याचे उत्पादन वाढल्याने, ग्राहकांची आवश्यकतेनुसार खरेदी केली जात आहे. तसंच, पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कांदा नाशवंत असल्याने किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. पंरतु, कांदा उत्पादन महत्त्वाचं नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव हा कांदा उत्पाक शेतखऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा भाग आहे. देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
तसंच, ही घोषणा होताच विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावत गप्प केले. तुम्ही फक्त गाजरं दिलीत, आम्ही गाजराचा हलवा दिलाय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.