मुंबई – मसालेनिर्मिती करणाऱ्या भारतातील दोन दिग्गज कंपन्यांच्या एकूण चार मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली. या मसाल्यांमध्ये इथिलन ऑक्साईड या किटकनाशकाचे प्रमाण अधिक आहे.
या घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका आहे, असे कारण या देशांनी दिले आहे. दरम्यान या दोन्ही देशांच्या निर्णयाची भारत सरकारने दखल घेतली आहे. भारत सरकारने या दोन्ही देशांना घेतलेल्या निर्णयाबाबत रिपोर्ट पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली, त्या कंपन्यांनाही सविस्तर माहिती विचारली आहे.
भारत सरकारने काय निर्णय घेतला?
भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सिंगापूर आणि हाँगकाँग या दोन्ही देशांना बंदी घालण्यात आलेल्या मसाल्यांबाबत एक विस्तृत रिपोर्ट पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे, त्या कंपन्यांनाही आपले सविस्तर मत मांडण्याचा आदेश दिला आहे. याबाबत वाणिज्य मंत्रालयातील एखा अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगने जो निर्णय घेतला आहे, त्याचा विश्लेषणात्मक रिपोर्ट तसेच ज्या निर्यातदारांचे मसाले नाकारण्यात आले, त्यांचीही माहिती मागवण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या दूतावासांना तशी विनंती करण्यात आली आहे. सिंगापूरच्या सेंटर फॉर फूड सेफ्टी आणि खाद्य आणि पर्यावरण स्वच्छता विभागालाही याबाबतचे रिपोर्ट देण्याची विनंती करण्यात आली आहे.
एकूण चार मसाल्यांवर घालण्यात आली बंदी
भारतातील मसाला निर्मिती करणाऱ्या दोन दिग्गज कंपन्यांच्या एकूण चार मसाल्यांच्या विक्रीवर सिंगापूर आणि हाँगकाँगवर बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमध्ये इथिलन ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले होते. बंदी घालण्यात आलेल्या मसाल्यांमध्ये मद्रास करी पावडर, मिश्रित मसाला पावडर, सांबर मसाला तसेच फिश करी मसाला यांचा समावेश आहे.
अभ्यास केल्यानंतरच काय ते समोर येणार
दरम्यान, हाँगकाँग आणि सिंगापूरच्या या निर्णयामुळे भारतात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये ईथिलीन ऑक्साईड यासारखे कर्करोगास कारणीभूत ठरणारे, घटक असू शकतात का? असे विचारले जात आहे. याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे. भारत सरकारने मागवलेल्या विस्तृत रिपोर्टचा अभ्यास केला जाईल. त्यावर संशोधन केले जाईल. त्यानंतरच काय ते समोर येईल.