पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी निधन झाले. स्वतः नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबद्दल माहिती देत, आई हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हीराबेन यांना बुधवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. मात्र शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 100 वर्षांच्या होत्या.

नरेंद्र मोदीं यांनी लिहिले की, ‘एका वैभवशाली शताब्दीचा देवाच्या चरणी विराम…आईमध्ये मी नेहमी ती त्रिमूर्ती अनुभवली आहे, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध असणाऱ्या जीवनाचा समावेश आहे.’ त्यांनी आणखी एक ट्विट केले की, ‘जेव्हा मी आईला तिच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेटलो, तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली, जी नेहमी माझ्या स्मरणात राहते. ती अशी की, बुद्धिमत्तेने काम करा व शुद्ध जीवन जगा’.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले आहेत. अहमदाबाद येथे ते आई हिराबेन यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहणार आहेत.