शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मूळ जातीची नोंद करा, शिक्षण उपसंचालकांच्या सूचना जारी

शाळेतून उत्तीर्ण होणाऱ्या तसेच शाळा सोडून अन्यत्र जाणाऱया विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मूळ जातीचा उल्लेख करण्याच्या सूचना मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी जारी केल्या आहेत.

काही कॉन्व्हेंट शाळा दाखल्यावर विद्यार्थ्याच्या मूळ जातीचा उल्लेख करीत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी पुढील प्रवेशावेळी आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहत होते. युवासेनेने याप्रकरणी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्याकडे तक्रार केली होती.

शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्याने जातीचा दाखला, जाच वैधता प्रमाणपत्र सादर केलेले असते. तरीदेखील शाळा सोडल्याच्या दाखल्यावर विद्यार्थ्याच्या मूळ जातीचा उल्लेख केलेला नसतो. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्याकडे आलेल्या तक्रारींनुसार वरळी येथील सिव्रेड हार्ट कॉन्व्हेट स्कूलमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर विद्यार्थ्याची मूळ जात लिहिण्यात येत नाही. या तक्रारीची दखल घेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी संगवे यांच्याकडे अशा शाळांची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत संगवे यांनी त्वरित परिपत्रक काढून शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मूळ जात लिहिण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे.