नोएडा – नोएडामधील सेक्टर 15 परिसरात एका धक्कादायक घटनेत 55 वर्षीय पतीने आपल्या पत्नीचा हातोड्याने वार करून खून केल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीचे परपुरुषांशी संबंध असल्याच्या संशयावरून ही क्रौर्याची घटना घडली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ही घटना शुक्रवारी (दि. ४ एप्रिल २०२५) सायंकाळच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव असमा खान (वय ४२) असून त्या नोएडाच्या सेक्टर ६२ मधील एका खाजगी IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. त्या मूळच्या दिल्लीतील असून, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते.
तसेच आरोपी नुरुल्ला हैदर (वय ५५) हा मूळचा बिहारचा असून, तोही अभियांत्रिकी पदवीधर आहे, परंतु सध्या बेरोजगार आहे. या दाम्पत्याचे २००५ मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा सध्या अभियांत्रिकी शिक्षण घेत असून, मुलगी आठवीत शिकत आहे.
कुटुंबातील कलहाच बनला हत्या कारणीभूत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुरुल्ला हैदर आणि असमा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. हैदरला संशय होता की असमाचे परपुरुषांशी संबंध आहेत. त्यावरून त्यांच्यात सतत भांडणं होत असत. शुक्रवारीदेखील त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात हैदरने हातात हातोडा घेऊन पत्नीच्या डोक्यावर जोरदार वार केला. या प्रहारात असमा जागीच कोसळली व तिचा मृत्यू झाला.
मुलाने पोलिसांना दिली माहिती
या धक्कादायक घटनेची माहिती सर्वात आधी दाम्पत्याच्या मुलाने 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले. तसेच, शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेबाबत बोलताना नोएडाचे पोलीस उपायुक्त रामबदन सिंह म्हणाले, “घटनेची माहिती मिळताच आमचा तपास पथक व फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले. आरोपीला अटक करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.”
कुटुंबीयांचा शोक
असमा खान यांच्या मेहुण्याने माध्यमांशी बोलताना सांगितले, “त्यांच्यात भांडणं होत होती, पण आम्हाला कधीच वाटलं नाही की हैदर इतका टोकाचा निर्णय घेईल. त्यांच्या मुलीने आम्हाला सकाळी घटनेची माहिती दिली. आम्ही सर्वजण हादरून गेलो आहोत.”
सांस्कृतिक व सामाजिक प्रश्न उपस्थित
ही घटना केवळ कौटुंबिक हिंसाचाराचे दर्शन घडवत नाही, तर ती समाजात वाढणाऱ्या संशय आणि असुरक्षिततेच्या भावना अधोरेखित करते. शिक्षित व शहरात स्थायिक झालेल्या दाम्पत्यामध्ये अशी क्रूर घटना घडणे हे समाजासाठी चिंतेचे कारण आहे.