आपल्याकडे असे म्हटले जाते की, शहाण्यांनी पोलिस स्टेशनची पायरी चढू नये. पण जर गुन्हा आपण घडताना पाहिला असेल किंवा एखाद्या गुन्ह्याची तक्रार करण्याची वेळ आपल्यावरच आली, तर मग काय? आपला मोबाईल किंवा किमती वस्तू हरवली असेल तर मग काय?
अशा वेळी आपण पोलिस ठाण्यात जातोच जातो. परंतू आता, पोलिस स्टेशनमध्ये न जाताही तुम्ही तुमची तक्रार करु शकता. यालाच ऑनलाईन तक्रार करणे म्हणतात. याबद्दल आपण या लेखातून सविस्तर जाणून घेणार आहोत.
गुन्ह्यांचे वर्गीकरण साधारण दोन प्रकारात केले जाते;
1. अदखलपात्र गुन्हा आणि 2. दखलपात्र गुन्हा
अदखलपात्र गुन्हा- म्हणजेच फारसे गंभीर नसलेले गुन्हे, हे खाजगी स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ फसवणूक, त्रास देणे, सार्वजनिक उपद्रव इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात कोणताही पोलिस अधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही.
दखलपात्र गुन्हा – म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, बलात्कार, हत्या, खंडणी, इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं.
तक्रार नोंदवण्याचा अनेक पद्धती आहेत. यात तक्रार धारक फोन करुन तक्रार दाखल करू शकतात. म्हणजेच एखाद्याला एखाद्या प्रकरणाची तक्रार करायची असल्यास तो व्यक्ती 112 क्रमांक डायल करून पोलिसांना कॉल करू शकतो. किंवा, थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवणे आणि अखेरीस ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवणे.
पोलिस ठाण्यात न जाता ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवणे –
ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवण्याचे अनेक फायदे आहेत. सध्या, ऑनलाइन तक्रार नोंदवणे ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची पद्धत आहे. तक्रार नोंदविण्यासाठी किंवा एफआयआर दाखल करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वापरणे सोपे आहे. वेबसाइटवरील पर्याय देखील समजणे सोपे आहे. ई-कॉपी ईमेलमध्ये सुरक्षित राहते आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सहज आपणास उपलब्ध होते. ऑनलाइन पोर्टलकडे तक्रारीची सद्यस्थिती तपासण्यासाठी एक विभाग आहे. एफआयआरची एक प्रत तक्रारदाराने दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवली जाते. म्हणून, तक्रारदाराने तक्रार नोंदवताना एक कार्यरत ईमेल पत्ता आणि / किंवा त्यांचे व्हॉट्सअॅप संपर्क निश्चित देणे आवश्यक आहे. गुन्ह्याची ऑनलाईन तक्रार नोंदवणे अधिक सोयीचे आहे व ते स्वस्त आहे.
आपल्याकडे अशी उदाहरणे समोर आहेत, जिथे पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास नकार देतात. अशा प्रथा टाळण्यासाठी, ऑनलाइन तक्रार नोंदवणे चांगले आहे, कारण ते नेहमीच रेकॉर्डवर असते. ते पोलिस हटवू शकत नाहीत. जे पोलीस अधिकारी आपली कर्तव्य बजावत नाहीत त्यांना काम करण्यास ऑनलाइन तक्रार भाग पाडू शकते. आणि तक्रारदारास यावर त्वरित उपाय मिळतो.
ऑनलाइन तक्रार कशी केली जाते?
ऑनलाइन तक्रार करण्यासाठी राज्य पोलीस वेबसाईटवर जावे लागते आणि वेबसाईट वरील दाखवलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन तक्रार वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा – https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx
हरवलेल्या मोबाईलची तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा – https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/MobileMissingForm.aspx
एफआयआर नोंदवताना, गुन्हा घडलेली नेमकी जागा, नेमका हा गुन्हा कधी घडला ती नेमकी वेळ, माहिती असल्यास गुन्हेगाराचे नाव, नाव माहिती नसल्यास त्याचे अचूक वर्णन, गुन्हा घडताना आजूबाजूला कोण व किती माणसे होती, त्याचा तपशीलवार व अचूक वर्णन, हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा होता इत्यादी. हे तपशीलवार लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र पोलीस वेबसाईट आहे. सध्या गुन्हा नोंदवण्याची ऑनलाइन पद्धतीत ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची आहे.