डिझेल गाड्यांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावण्यात येणार असल्याचं वृत्त काही वेळापूर्वी प्रसारित झालं होतं. मात्र, अशा प्रकारे कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केलं आहे.
काही वेळापूर्वी अशा प्रकारचं वृत्त प्रसारित झालं होतं. त्यात एका जाहीर कार्यक्रमात गडकरींनी एका प्रस्तावाविषयी उल्लेख केल्याचं म्हटलं होतं. गडकरी यांनी एक पत्र लिहून अर्थमंत्र्यांकडे देण्याविषयी उल्लेख कला होता. या पत्रात डिझेल वाहने आणि डिझेलचलित सगळ्या इंजिनांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव नमूद आहे. डिझेल वाहनांमुळे देशात सर्वाधिक प्रदुषण होतं. त्यामुळे डिझेलवरील वाहनांची निर्मिती घटवण्यासाठी आणि पर्यायाने देशातील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी हा प्रस्ताव पाठवणार असल्याचा उल्लेख त्या वृत्तात करण्यात आला होता.
मात्र, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी केलं आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं आहे. अशा प्रकारे अतिरिक्त कर लादण्याचा कोणताही विचार सध्या सरकार करत नसल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.