निलेश लंकेंनी केलं चॅलेंज पूर्ण! संसदेत घेतली इंग्रजीतून शपथ; अन् शेवटी म्हणाले.

अहमदनगर लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर लोकसभेचा सदस्य म्हणून निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेऊन सुजय विखे पाटलांचे आव्हान पूर्ण करून दाखवले आहे.

यावेळी संसदेत इंग्रजीमध्ये शपथ घेताच त्यांनी सर्वांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. यामुळे निलेश लंके पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहे.

अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवले होते. सुजय विखे पाटील यांनी भाषणात निलेश लंके इंग्रजीतून कसं बोलणार, त्यांना इंग्रजी येते का? असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. सुजय विखे यांनी मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे म्हटले होते.

या मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं, असे सुजय विखेंनी म्हटले होते.

सुजय विखेंच्या टीकेवर लंकेचा पलटवार

त्यावर समोरच्या उमेदवाराकडे पैशाची मस्ती आहे. एका बाजूला सांगायचं की जे सक्षम आहे, त्यांनीच राजकारण करायचं, दुसरीकडे सांगायचं निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही. पण, मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे म्हणत सुजय विखेंच्या टीकेवर लंकेनी पलटवार केला होता.

“आय निलेश ज्ञानदेव लंके…”; निलेश लंकेची इंग्रजीतून शपथ

यानंतर निलेश लंके यांनी हे आव्हान स्वीकारत सुजय विखे पाटील यांना सडेतोड उत्तर दिले आहे. दिल्लीच्या संसदेत जाताना खासदार निलेश लंके यांनी पायऱ्यांवर डोकं टेकलं. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचे नाव पुकारले. तेव्हा निलेश लंके यांनी “आय निलेश ज्ञानदेव लंके…” असे इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी’ म्हणत हात जोडले, त्यामुळे लंके यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता.