महात्मा जोतिराव फुले व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या सध्या एक हजार आहे.
महात्मा जोतिराव फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री या दोन्ही जनआरोग्य योजनांच्या एकत्रिकरणाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.
त्यामुळे या आरोग्य योजनेअंतर्गत आता १३५६ आजारांवर उपचार केले जाणार आहेत.
यासमवेतच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण २०२० पासून राज्यात करण्यात आले आहे. या योजनेचे आता विस्तारीकरण करण्यात येऊन जास्तीत जास्त जनतेला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नवीन तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.
पाच लाखांपर्यंतचे आरोग्य संरक्षण
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये, तर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपये एवढे आरोग्य संरक्षण मिळते. दोन्ही योजनांच्या एकत्रिकरणामुळे सर्वांनाच प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळणार आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट न होणाऱ्या लाभार्थ्यांचा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येणार आहे.