मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश; महादेव बेटिंग अ‍ॅपसंबंधात पहिली अटक

मुंबई – महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात क्राईम ब्रँचने पहिली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय दीक्षित कोठारी याला अटक करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी माटूंगा पोलीस स्टेशनमधे एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित करण्यात आले होते. त्यानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.

महादेव बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर हा दुबईत असून त्याला नजरकैदत ठेवण्यात आले आहे. चंद्राकर हा याप्रकरणात मास्टर माईंड असल्याचं सांगण्यात येतंय. याच प्रकरणी प्रवर्तक रवी उप्पल याला दुबईत अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय याप्रकरणात तपास करत आहे.

मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रवर्तक रवी उप्पल याविरोधात इडीने रेड नोसीट जारी केली होती. त्यानंतर दुबईतील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर या दोघांना भारत सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे देखील नाव घेण्यात आले होते. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसल्याचं बोललं जातं.

दरम्यान, सौरभ चंद्राकर याने दुबईमध्ये भव्य लग्नाचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल २०० कोटीं रोख रकमेचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं. त्याने अनेक बॉलिवूड कलाकारांना लग्नाचे निमंत्रण दिले होते. तसेच प्रायवेट जेटने आपल्या कुटुंबियाना नागपूरमधून दुबईमध्ये आणलं होतं.