दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी तब्बल ₹३३ कोटी खर्च झाल्याचे भारताच्या महालेखापाल आणि लेखापरीक्षक (CAG) यांनी उघड केले आहे. प्रारंभीच्या ₹७.९ कोटी अंदाजित खर्चाच्या तुलनेत हा खर्च सुमारे चार पट जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
CAG च्या अहवालानुसार, २०२० साली सुरू झालेल्या या नूतनीकरणामध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि आलिशान सुविधा जोडण्यात आल्या आहेत. या खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- ८८-इंच ८के LG OLED टीव्ही: ₹२८.९ लाख
- दहा ४के Sony OLED टीव्ही: ₹४३.९ लाख
- Samsung ‘फ्रेंच डोअर’ रेफ्रिजरेटर: ₹३.२ लाख
- मायक्रोवेव्ह ओव्हन: ₹१.८ लाख
- दोन स्टीम ओव्हन: ₹६.५ लाख
- ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन: ₹१.९ लाख
- १० बेड्स व सोफा सेट: ₹१३ लाख

याशिवाय, Public Works Department (PWD) ने या बंगल्यात जकूझी, सौना आणि स्पा यांसारख्या सुविधा ₹१९.५ लाखांच्या खर्चाने बसवल्या. सात सेवकांसाठी नवीन निवासस्थाने बांधण्यासाठी ₹१९.८ कोटी खर्च करण्यात आले.
CAG अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
CAG च्या अहवालानुसार, मार्च २०२२ पर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र, काम २०२३ पर्यंत सुरू असल्याने एकूण खर्च याहून अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे.
CAG ने यासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत:
- कागदपत्रांचा अभाव: खर्चाची पडताळणी करणे कठीण झाले कारण सर्व कागदपत्रे उपलब्ध नव्हती.
- नूतनीकरणासाठी अभ्यास नाही: निवासस्थानाच्या पुनर्रचनेसाठी सखोल अभ्यास करण्यात आला नव्हता.
- अतिरिक्त खर्च: ₹२५.८ कोटींच्या अतिरिक्त कामांसाठी निविदा न काढता थेट PWD ने काम केले.
- बांधकाम खर्चाचे विचलन: सेवकांसाठी बांधकामासाठी असलेला ₹१९.८ कोटींचा निधी इतरत्र वापरण्यात आला.
राजकीय वाद आणि आरोप
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ६ Flagstaff Road या बंगल्यात सप्टेंबर २०२४ पर्यंत वास्तव्य केले. यावेळी या नूतनीकरणाच्या खर्चावरून भाजप आणि काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील गेल्या काही दिवसांत यावर टीका करत, “कोविडच्या कठीण काळात केजरीवालांनी आपले ‘शीश महाल’ उभे केले,” असे म्हटले.
निवासस्थानाचे वैशिष्ट्ये
नूतनीकरणानंतर निवासस्थानाचा एकूण बांधकाम क्षेत्रफळ २१,००० चौ.फुट असून, यामध्ये खालील सुविधा समाविष्ट आहेत:
- ८ बेडरूम्स
- ३ बैठक कक्ष
- २ स्वागत कक्ष
- २ स्वयंपाकघर
- १२ शौचालये
- १ डायनिंग हॉल
याशिवाय, २४ सोफा सेट, ७६ टेबल, ४५ खुर्च्या, ८ बेड्स आणि ५ रेक्लायनर सोफा यांचा समावेश आहे. एकूण ₹४ लाखांच्या खर्चाने ७५ Bose सीलिंग स्पीकर्स आणि ५० एसी विविध भागांमध्ये बसवण्यात आले.
PWD कडून निवड प्रक्रियेत अनियमितता
CAG ने तीन कन्सल्टंसी फर्म्स आणि ठेकेदारांची निवड “अस्पष्ट निकषांवर” झाल्याचा ठपका ठेवला आहे. याशिवाय, कामासाठी निविदा प्रक्रिया मर्यादित स्वरूपात पार पडली, असे अहवालात नमूद आहे.