ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 400 हून अधिक भाविक जखमी झाले. त्याचवेळी एका भाविकाचा मृत्यू झाला.
चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यातील अनेक भाविकांना किरकोळ दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
गंभीर जखमी भाविकांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात जीव गमावलेला भाविक ओडिशाच्या बाहेरचा असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. त्याचबरोबर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर काही भाविकांमध्ये बाचाबाची झाल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात 400 हून अधिक भाविक खाली पडले. यावेळी पडून भाविक जखमी झाले. याच एकाचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे.
पुरीमध्ये 53 वर्षांनंतर भगवान जगन्नाथाची रथयात्रा दोन दिवसांची होत आहे. 1971 पासून ही रथयात्रा एक दिवसाची होत होती. यंदा ती दोन दिवसांची करण्यात आली आहे. दरवर्षी होणाऱ्या या रथयात्रेत मोठ्या संख्येने भाविक नेहमीच सहभागी होतात.
दरम्यान सर्व जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 50 हून अधिक भाविकांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
इतर जखमी भाविकांवर पुरीच्या मुख्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत भाविक ओडिशाच्या बाहेरील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, मृत भाविकाची ओळख पटलेली नाही.
पुरी रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी जिल्हा मुख्य रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले.
आरोग्यमंत्र्यांनी जखमींशीही चर्चा केली. तसेच कोणत्या परिस्थितीत चेंगराचेंगरी झाली आणि अशी परिस्थिती निर्माण झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.