हातावर मेहंदी काढून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनी तसेच रक्षाबंधनानंतर राखी बांधून शाळेत येणारे, टिळा किंवा गंध लावणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा कोणतीही शारीरिक शिक्षा करू शकत नाही किंवा या विद्यार्थ्यांना शिक्षक, शाळेतील अन्य कर्मचारी वर्ग त्रास देऊ शकत नाही, असे आदेश राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने जारी केले आहेत.
अनेक शाळा देशभरात साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सवावेळी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करतात. विद्यार्थ्यांना शाळेत राखी बांधून येण्यास मज्जाव केला जातो. टिळा किंवा गंध लावणे, मुलींना हातावर मेहंदी काढण्याची परवानगीही काही शाळा नाकारतात. शाळेच्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा केली जाते. वर्षानुवर्षे शालेय विद्यार्थ्यांसोबत सुरू असलेल्या या गंभीर विषयाची राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या कलम 17 नुसार शाळा अशी शिक्षा करू शकत नाहीत, ही बाब राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने निदर्शनास आणून देत देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शालेय शिक्षण सचिवांसाठी नोटीस जारी केली आहे.
शाळांमध्ये कोणत्याही विशिष्ट प्रथेचे पालन होणार नाही. तसेच या विशिष्ट प्रथेचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा केली जाणार नाही, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. याविषयीचे निर्देश शाळांसाठी जारी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, असे राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी राज्यांच्या शालेय शिक्षण सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.