मध्यप्रदेशमधील  फॅक्टरीत भीषण आग! ६ कामगारांचा मृत्यू तर ५० हून अधिक जण जखमी

२५ हून अधिक जण आगीत अडकल्याची भीती

भोपाळ – मध्यप्रदेशातील हरदामध्ये  फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक होरपळले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारखान्यात आणखी २० ते २५ कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन बैठक बोलावली, तसंच मुख्यमंत्री जातीने या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

हरदा येथील बैरागढ फटाका कारखान्यात स्फोट झाला. या कारखान्यात काही लोक अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी SDRF ची टीम पोहचली आहे. तसंच घटनास्थळी रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. आगीचे भलेमोठे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट या ठिकाणी पसरले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक पोहचले असून ते आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण त्यानंतरच बचावकार्य करता येणार आहे. या फॅक्टरीत फटाके असल्याने आग वारंवार भडकते आहे.

हरदामध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर नर्मदापुरम आणि बैतूर या ठिकाणांहूनही एसडीआरएफचं पथक आणि मदतीचं साहित्य पाठवण्यात आलं आहे. तसंच नर्मदापुरम या ठिकाणाहून तीन रुग्णवाहिका आणि सहा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. तसंच एसडीआरएफचे १९ जवानही पोहचले आहेत.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली मदत जाहीर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जे लोक या घटनेत जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. जे लोक या घटनेत होरपळले आहेत त्यांना भोपाळ, इंदूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.