ममता बॅनर्जी यांचे थेट केंद्र सरकारला पत्र,अफूची शेती करायला परवानगी द्या;दिलं ‘हे’ कारण…

अफूची शेती करणे किंवा तस्करी करणे गंभीर गुन्हा असून यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अफूची शेती करण्याची परवानगी मागितली आहे. ममता बॅनर्जी यांनी थेट केंद्र सरकारला या संदर्भात पत्र लिहिले आहे.

शेतीसाठी उपलब्ध जमिनीमध्ये आम्ही अफूची लागवड करू. आमच्याकडे अशी बरीच जमीन आहे. जर आम्ही आमच्या राज्यात अफू फिकवू लागलो तर आम्हाला तो 1 हजार रुपयांऐवजी 100 रुपये प्रति किलो दराने खरेदी करता येईल. सर्वसंमतीने याबाबत निर्णय घ्या, कारण सर्वच पोस्तो किंवा खसखस हे ड्रग्स नसतात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी विधानसभेतही याबाबत विधान केले. पोस्तो किंवा खसखस (अफूचे बी) महाक आहे, कारण त्याची लागवड काही राज्यांमध्येच केली जाते. परंतु बंगाली लोकांना खसखसपासून बनवलेले पदार्थ आवडतात, असे त्या म्हणाल्या. याची शेती फक्त चार राज्यांमध्येच का केली जाते? प्रत्येक दिवशी आमच्या आहारात असूनही पश्चिम बंगालमध्ये याची लागवड का केली जात नाही? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. अफूची लागवड केल्यास राज्यातील लोकांना त्यापासून मिळणाऱ्या खसखसपासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल, असेही त्या म्हणाल्या.

आम्हाला इतर राज्यांतून वाढीव किंमतींमध्ये खसखस खरेदी करावी लागते. मात्र पश्चिम बंगालमध्येच याची शेती करण्यास परवानगी दिल्यास असे होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. तसेच याबाबत विरोधी पक्षांनाही पत्र लिहिण्यास सांगणार असल्याच्या त्या म्हणल्या.

खसखस म्हणजे काय?

खसखस ही अफूच्या बोंडांमध्ये मिळते. हिंदुस्थानात ज्या ज्या भागात अफूची शेती असते अशा मध्य प्रदेशासारख्या राज्यांत खसखशीचे उत्पादन होते. महाराष्ट्रात हिचा उपयोग दिवाळीतील अनरसा नावाचा पदार्थ करण्यास, मकर संक्रांतीचा हलवा करण्यास किंवा काही विशिष्ट पाककृतींमध्ये करतात. बाळंतिणीच्या पौष्टिक आहारात खसखशीची खीर असते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh