कृषी उत्पन्न बाजार समितीतील 12 दुकानांना लावले सील! जळगाव महापालिकेची मोठी कारवाई

जळगाव – कर न भरल्याने महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ दुकानांना महापालिकेने आज सील लावले. प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या मार्केट यार्ड भागातील एकूण ६४ दुकानांची मालमत्ता कराची २८ लाख रुपये थकबाकी होती.

महापालिका प्रशासनाकडून संबंधितांना यापूर्वीच अधिपत्र बजावले. परंतु संबंधितांनी थकबाकी भरलीच नाही, त्यामुळे महापालिकेने आज कारवाई करण्याचे आदेश देत, दुकाने सीलबंद करण्यासाठी एस एस पाटील व प्रकाश सोनवणे यांच्या अधिपत्याखाली दोन पथकांची नियुक्ती केली.

दोन्ही पथकात प्रत्येकी दहा कर्मचारी नेमून ही मोहीम राबविताना दिवसभर १२ दुकाने सील केली.

दुकानदारांनी रक्कम भरली

कारवाई टाळण्यासाठी २४ दुकानदारांनी ९ लाखांचा भरणा केला. तर थकबाकी न भरणाऱ्यावर उद्या मंगळवारी (ता.९) कार्यवाही केली जाणार आहे.

ज्या मिळकतधारकांनी, मालमत्ता थकबाकी धारकांनी अभय शास्ती माफी योजनेचा लाभ घेतल्यानंतरही थकबाकी भरलेली नाही अशावर प्रशासन यापुढे मालमत्ता जप्ती कार्यवाहीत सातत्य ठेवणार आहे.

त्यामुळे थकबाकी भरणा केलेला नसलेल्या मिळकतधारकांनी त्वरित थकबाकी भरुन जप्तीची कार्यवाही टाळावी. असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड व उपायुक्त निर्मला गायकवाड व सह आयुक्त गणेश चाटे यांनी केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh