ठाकरे गटातील आमदारावर मोठी कारवाई! १२५ जणांवर गुन्हा दाखल! काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील पाणी नागपूर येथे जाऊन देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत एकत्र झालेल्या आमदारांसह १२५ जणांवर जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

बाळापूर व अकोला जिल्ह्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आमदार नितीन देशमुख यांनी सोमवार, ता. १० एप्रिल रोजी अकोला येथून नागपूरकरिता संघर्ष यात्रा काढली आहे. राजराजेश्वर मंदिरापासून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली होती.

यावेळी शेकडो शिवसैनिकांसह ६९ खेड्यातील ग्रामस्थ सहभाग झाले होते. जिल्ह्यात जमावबंदी असताना आमदार नितीन देशमुख यांनी नागरिकांना एकत्र केल्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह १२५ जणांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का – देशमुख

खारे पाणी पिणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या हक्कासाठी संघर्ष यात्रा काढली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणारे अकोला पोलिस गुरुवारी राज्याचे गृहमंत्री तथा उममुख्यमंत्री अकोल्यात आले असता त्यांच्या स्वागतासाठी एकत्रित आलेल्या लोकांवर व गृहमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवेल का, असा प्रश्न आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात जमावबंदी कशासाठी लावली, असा सवालही त्यांनी केला. केवळ शिवसेना संघर्ष यात्रा काढणार आहे म्हणून जमावबंदी लागू केली काय, असा प्रश्नही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh