महाराष्ट्रात आता ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ मोहीम सुरू करण्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या विशेष मोहिमेची सुरुवात झाली असून शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त वर्ली येथे अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले.
ही मोहीम पुण्यातील वैश्णवी हगवणे या युवतीच्या हुंडाबळी प्रकरणानंतर सुरू करण्यात आली आहे. वैश्णवी हगवणे हिने १६ मे रोजी पुण्यातील सासरी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली.
“आता महाराष्ट्रातील प्रत्येक सून ही माझी बहीण आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मी आणि शिवसेना महिला आघाडी पूर्ण ताकदीने उभे राहणार. प्रत्येक सेनेच्या शाखेतून ही मोहीम राबवली जाईल. सूनबाईंचं पहिलं माहेर आता सेनेच्या शाखा असतील,” असं भावनिक प्रतिपादन शिंदे यांनी केलं.
ही मोहीम आनंद आश्रम, ठाणे येथून औपचारिकपणे सुरू होणार असून नंतर राज्यभरातील सर्व शाखांमध्ये विस्तारली जाणार आहे. महिलांवरील हुंड्याच्या नावाखाली होणाऱ्या त्रासांना आळा घालण्यासाठी महिला आघाडी प्रयत्नशील राहील, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
यामध्ये कायदेशीर मदत, जनजागृती मोहीम, तसेच पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्यही करण्यात येईल.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ‘हुंडामुक्त, अत्याचारमुक्त महाराष्ट्र’ अशी स्वतंत्र मोहीम जाहीर केली आहे. २२ जूनपासून वर्षभर चालणारी ही मोहीम सर्व पक्षीय सहकार्याने राज्यभर राबवली जाणार आहे.