महाराष्ट्रातील दारूप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या महसुलात वाढ करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यात दारूवरील अबकारी शुल्क वाढवण्याचा समावेश आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दरवर्षी सुमारे 14,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे.
सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, आता भारतात तयार होणाऱ्या विदेशी दारूवरील (Indian Made Foreign Liquor) अबकारी शुल्क उत्पादन खर्चाच्या 4.5 पट इतके आकारले जाणार आहे. यापूर्वी हे शुल्क उत्पादन खर्चाच्या 3 पट इतके होते आणि दराची कमाल मर्यादा 260 रुपये प्रति बल्क लिटर होती. तसेच देशी दारूवरील शुल्क 180 रुपयांवरून 205 रुपये प्रति प्रूफ लिटर इतके करण्यात आले आहे.
राज्यातील दारूचे किमान किरकोळ दर (MRP) देखील नवीन संरचनेनुसार निश्चित करण्यात आले आहेत. 180 मि.ली. बाटलीसाठी आता विदेशी प्रीमियम दारूची किंमत किमान 360 रुपये असेल, तर देशी दारूची किंमत 80 रुपये पासून सुरू होईल. सरकारने “महाराष्ट्र मेड लिकर” (MML) या नवीन श्रेणीची घोषणा केली आहे, जी केवळ स्थानिक उत्पादकांकडून तयार केली जाणार आहे. या MML ब्रँडसाठी नवीन नोंदणी आवश्यक असेल आणि किंमत किमान 148 रुपये ठेवण्यात आली आहे.
तसेच, FL-2 (बंद बाटली विक्री) आणि FL-3 (हॉटेल्स/बारमधील विक्री) परवानग्या आता कॉन्ट्रॅक्ट अॅग्रीमेंट्सद्वारे चालवता येणार आहेत. मात्र यासाठी अनुक्रमे 15% आणि 10% वार्षिक अतिरिक्त परवाना शुल्क आकारले जाईल. या निर्णयाचा परिणाम राज्यातील बार, हॉटेल्स आणि दारू दुकानदारांवर होण्याची शक्यता आहे.
अबकारी विभागात 1,223 नवीन पदे निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामध्ये 744 नियमित व 479 पर्यवेक्षक पदांचा समावेश आहे. या बदलांमुळे महसुलात मोठी वाढ अपेक्षित आहे.
इतर राज्यांतील दारू दरांच्या तुलनेत काय परिस्थिती आहे?
सध्या भारतातील सर्वाधिक दारू कर कर्नाटकमध्ये आहे, जिथे मूळ किमतीवर 83% सेस आकारला जातो. तेलंगणामध्ये देखील दर उच्च आहेत. मुंबईतील दारूच्या किंमती नवीन दरांनंतर बंगलोर आणि हैदराबादच्या मागे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीमध्ये अजूनही सर्वात स्वस्त दारू उपलब्ध असून 180 मि.ली. IMFL बाटलीची किंमत अंदाजे 120 ते 150 रुपये आहे.