महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी राज्यात 26 जिल्हे होते. नंतर लोकसंख्या वाढ आणि स्थानिक गरजांच्या आधारे, जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला. यानंतर राज्यात पुन्हा नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची चर्चा वारंवार होत असते.
व्हायरल पोस्टने उभे केले प्रश्नचिन्ह
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एका पोस्टमुळे गोंधळ उडाला आहे. या पोस्टमध्ये 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.
फेक पोस्टचा मागोवा
व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, राज्यातील विद्यमान 36 जिल्ह्यांपैकी अनेकांचे विभाजन होऊन 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या अधिकृत स्त्रोतांनी याला खोटं ठरवलं आहे.
नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी येणारा खर्च
नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठा आर्थिक भार सरकारवर येतो. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, इतर प्रशासकीय इमारती आणि कर्मचारी नेमणूक यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. सध्या राज्य सरकारकडे अनेक महत्वाच्या योजनांसाठी निधी वितरित होत असल्याने, इतक्या मोठ्या आर्थिक भाराचा सामना करण्याची तयारी नाही, असे प्रशासनातील तज्ज्ञांचे मत आहे.
सरकारचा अधिकृत प्रतिसाद
महाराष्ट्र सरकारने अद्याप 21 नवीन जिल्ह्यांची निर्मितीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट ही फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विकिपीडियावर अनेक वर्षांपूर्वी काही जिल्ह्यांच्या संभाव्य विभाजनाची माहिती नमूद आहे. या माहितीचा वापर करून चुकीची पोस्ट तयार करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
फॅक्ट चेक रिपोर्ट
व्हायरल पोस्टचा तपास करताना असे दिसून आले की, या दाव्याला कोणताही आधार नाही. राज्य सरकारच्या कोणत्याही अधिकृत घोषणेत 21 नवीन जिल्ह्यांची निर्मितीबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावरून अफवा पसरण्याचे धोके
सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अफवा पसरवल्या जातात ज्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. सरकारने अशा फेक पोस्ट्सबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.