महाराष्ट्राला वेड लावणार्‍या गौतमीचे वडील सापडले बेवारस अवस्थेत

नातेवाईक म्हणतात, गौतमीशी आमचा काहीही संबंध नाही…

धुळे – आपल्या अदाकारीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणार्‍या गौतमी पाटीलबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गौतमी पाटीलचे वडील धुळे येथे बेवारस अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर सध्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. रवींद्र बाबुराव नेरपगारे पाटील असं गौतमीच्या वडिलांचं नाव आहे. यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणार्‍या गौतमीचे वडील अशा अवस्थेत का सापडले असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गौतमी पाटीलचे वडील शेतकरी आहेत. तिच्या वडिलांवर धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच गौतमी पाटीलची काकू आणि तिची चुलत बहीण हे हिरे रुग्णालयात दाखल झाले. मात्र त्यांनी गौतमी पाटीलशी आमचा काहीही संबंध नाही अशी माहिती दिली आहे. ते असं का म्हणाले याबद्दल काही कळू शकलेले नाही.

नेमकं प्रकरण काय?

धुळे शहरातील आजळकर नगर भागात एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन बेवारस अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर त्या व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्याकडे सापडलेले आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचं समोर आलं.

धक्कादायक माहिती समोर येताच स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांनी गौतमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर नाशिक येथे असणारे त्यांचे काही नातेवाईक तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. गौतमी पाटीलच्या वडिलांवर सध्या धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे दुर्गेश चव्हाण यांनी दिली आहे.

गौतमीने मला आर्थिक मदत करावी

मागे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रवींद्र पाटील म्हणाले होते की, आपली लेक गौतमी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहे, त्याचा अभिमान वाटतो. मात्र काही गोष्टींमुळे तिच्यावर टीका होते तेव्हा दुःख होतं. आपल्या व्यसनामुळे किंवा कौटुंबिक वादामुळे मुलगी गौतमी आणि तिची आई हे दोघे सोबत नसल्याचं मोठं दुःखही रवींद्र पाटील यांना आहे. गौतमीची खूप आठवण येते. ती व तिच्या आईने पुन्हा आपल्या सोबत राहायला यावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मध्यंतरी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत “मी आता एकटाच राहात असल्याने गौतमीने मला आर्थिक मदत करावी” अशी मागणी त्यांनी केली होती.

jalgaonsandesh

jalgaonsandesh