महाराज तुमचा अवमान करणाऱ्या गद्दारांना आम्ही गाडणारच! शिवसेनेने ठणकावले

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. सोमवारी हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात पूर्णत: कोसळला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार टीका करत मिंधे सरकारला फटकारले आहे.

शिवसेनेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर या घटनेचे फोटो व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ”लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घाई घाईत मिंधे- भाजप सरकारने सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक केवळ 8 महिन्यांत कोसळले. महाराज तुमचा अवमान करणाऱ्या गद्दारांना आम्ही गाडणारच”, अशी पोस्ट शिवसेनेने केली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप त्यावेळी स्थानिकांनी केला होता. मात्र त्याकडे मिंधे सरकारने दुर्लक्ष केले होते. आज अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पूर्णत: कोसळला आहे. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

4 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh